नाशिक : नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या दोन वर्षांत पुन्हा गतवैभव प्राप्त होत असून २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेला ५३ कोटी ४१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विजय साने यांच्यासह उपाध्यक्ष हरीश लोढा व जनसंपर्क संचालक रजनी जातेगावकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटातही बँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद करीत बँकेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर बँकेचा ढोबळ (ग्रॉस) एनपीए ३८.३८ टक्क्यांवरून १२.७३ टक्क्यांपर्यंत म्हणजे २५.६५ टक्क्यांनी कमी झाला असून निव्वळ एनपीए २०.२१ टक्क्यांहून ३१ मार्च २०२१ अखेर शून्य टक्क करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने पूर्ण केल्याचे बँकेचे अध्यक्ष विजय साने यांनी सांगितले. बँकेने ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५३.४१ कोटींचा ढोबळ नफा मिळवला असला तरी सर्व आवश्यक त्या तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा १५.४८ कोटींचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर ठेवींमध्ये वाढ होऊन त्या १६८१.५६ कोटींपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, बँकेला नफा झाल्यानंतर लाभांश वाटपासाठी तरतूद करूनही कोरोना संकटामुळे रिझर्व्ह बँकेकडून सभासदांना लाभांश वाटपावर निर्बंध असल्याने लाभांश वाटप होऊ शकणार नसल्याचे अध्यक्ष विजय साने यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी संचालक मंडळातील वसंत गीते. हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, शिवदास डागा, अविनाश गोठी, सुभाष नहार, कांतीलाल जैन, रंजन ठाकरे, गणेश गीते, प्रफुल्ल संचेती आदी उपस्थित होते.