नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभल्याचे केलेले वक्तव्य व त्यानंतर लागलीच भुजबळ समर्थकांकडून त्याचे खंडण करण्यात आले असले तरी, दराडे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची कारणे शोधली जात आहेत. दराडे यांनी आपल्या विजयात भुजबळांना ओढून एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांचे नाव घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. मुळात या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्याशी दराडे यांची सरळ लढत होती. सहाणे यांनी भुजबळ यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी आशीर्वादही मागितल्यावर भुजबळ यांनी ‘पक्षाची उमेदवारी हाच आशीर्वाद’ असे सांगून सहाणे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार असल्याचे जाहीर केले होते. असे असतानाही दराडे यांनी भुजबळ यांना विजयाचे श्रेय देण्यामागच्या राजकारणाची चर्चा होऊ लागली आहे. भुजबळ यांचे ओबीसी समाजाप्रती असलेले प्रेम पाहता त्यांचा कौल आपल्यालाच मिळाल्याचे दाखविण्यात दराडे ज्याप्रमाणे यशस्वी झाले त्याचप्रमाणात या निवडणुकीत जातीयवादी प्रचार करणाऱ्यांना त्यांनी भुजबळ यांचे नाव घेत चोख उत्तर दिल्याचे मानले जात आहे.शिवसेनेने या विजयाचे श्रेय एकट्याकडे न घेता, भुजबळांशी असलेल्या सख्यामुळे विजय सोपा झाल्याचे दाखविण्याचा दराडे यांनी प्रयत्न केला आहे. दराडे हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार असले तरी, त्यांची मातृभूमी येवला विधानसभा मतदारसंघ असून, गेल्या दहा वर्षांपासून छगन भुजबळ हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, अशा परिस्थितीत भुजबळ यांना विजयाचे श्रेय न देता दराडे यांना येवला मतदारसंघात काम करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे विजयाचे श्रेय व मोठेपण भुजबळ यांना देऊन दराडे यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल आणखी सुकर करून घेतल्याचाही त्यातून अर्थ काढला जात आहे.
भुजबळांचे नाव घेत दराडेंचे एका दगडात दोन पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:10 AM