सिडको : बचत गटाचा बनाव करत गृहकर्ज मंजुरीचे आमिष दाखवून सिडको भागातील एका महिलेने २६ महिलांकडून कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली हजारो रुपये उकळून तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेखा देवरे यांनी गृहकर्जासाठी त्यांच्या मैत्रिणीच्या माध्यमातून संशयित वहिदा इब्राहीम खान या महिलेची राहत्या घरी २०१५ साली भेट घेतली. यावेळी देवरे यांना खान हिने पाच लाखांच्या कर्जासाठी पाच हजार रुपयांप्रमाणे प्रोसेसिंग फी द्यावी लागते, असे सांगून विश्वासात घेतले. देवरे यांनी तिला जास्त कर्जाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने जास्तीत जास्त ३५ लाखांचे कर्ज बचत गटाद्वारे उपलब्ध होऊ शकते असे सांगून त्यासाठी ४५ हजार रुपये शुल्क म्हणून मागितले.कर्ज मंजूर न झाल्यास ही रक्कम पुन्हा परत करण्याची हमीदेखील दिली. त्यामुळे देवरे यांना खानवर विश्वास बसला. त्यांनी वेळोवेळी पैसे देत सुमारे १५ लाख ८० हजार रुपये खानकडे जमा केले; मात्र कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याने त्यांनी तिच्याकडे तगादा लावला. त्यांच्या तगाद्याला कंटाळून खान हिने क र्जाची रक्कम माझ्या स्वत:च्या बॅँक खात्यात जमा झाल्याचे सांगून देवरे यांना स्टेट बॅँकेचा धनादेश दिला; मात्र तो धनादेश बॅँकेत वटला नाही. त्यानंतर पुन्हा देवरे यांनी खान यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्याने पुन्हा तिने देवरे यांना विविध बॅँकांचे धनादेश वेळोवेळी देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र एकाही बॅँकेचा धनादेश बॅँक खात्यात योग्य रक्कम नसल्याने वटू शकला नाही. त्यानंतर खान हिने देवरे यांना उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यामुळे देवरे यांनी त्या महिलेविषयी अधिक चौकशी केली असता सुमारे २६ महिलांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचे त्यांच्या लक्षात येताच पायाखालची वाळू सरकली.त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित वहिदा खान या महिलेविरुद्ध फिर्याद दाखल केली.सुमारे १ कोटी ८ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक खान हिने २६ महिलांना विश्वासात घेऊन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
गृहकर्जाच्या नावाखाली २६ महिलांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:45 AM