गुरुवारी दिवसभर प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापन ऑक्सिजनच्या तुटवड्याने त्रस्त असल्याने त्यांनी नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल करून घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली. परिणामी रुग्णालयात उपचारार्थ रुग्णांबरोबरच नवीन रुग्णांचाही जीव टांगणीला लागल्याचे चित्र होते. अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयांचे उंबरठे झिजवित होते. जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालये अगोदरच फुल्ल झाल्यामुळे तेथील दरवाजेदेखील नवीन रुग्णांसाठी याअगोदरच बंद करण्यात आल्याने रुग्ण न्यावे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट====
खासदारांची घोषणा हवेत
दोनच दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या हवाल्याने सोमवारपासून नाशिकसाठी १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा मंजूर केल्याचा दावा केला होता. नाशिक जिल्ह्यासाठी दररोज १२० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असली तरी, १०५ ते ११० मेट्रिक टन ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर गरज भागत असल्याने गोडसे यांच्या दाव्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला होता. प्रत्यक्षात मात्र तीन दिवसांपासून जेमतेम पुरवठा होत आहे.