सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता नसते. वैद्यकीय मापदंडानुसारच रुग्णांना रेमडेसिवीर देणे अपेक्षित आहे; परंतु असे असतानाही मालेगावसह नाशिक शहरात रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागत आहेत.
डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, एचआरसीटीचा रिपोर्ट तसेच आधार कार्ड असल्याशिवाय रेमडेसिवीर दिले जाऊ नये, असे आदेश असतानादेखील याची पूर्तता नसतानाही काही मेडिकल्समध्ये जादा दराने रेमडेसिवीरची विक्री झाल्याची बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनवर संबंधित रुग्णाचे ना लिहिण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकारामुळे संबंधित रुग्णापर्यंतच इंजेक्शन पोहोचेल तसेच इतर कुणाला नाव असलेले इंजेक्शन मेडिकल्स किंवा रुग्णालयाकडून दिले गेल्यास तात्काळ लक्षात येऊ शकेल. यासाठी अशा प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.