घोटी : घोटी-वैतरणा रस्त्यावर घोटीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्नोली गावच्या महिला सरपंचाची व्यथा निराळी आहे. तब्बल पाच पंचवार्षिक सलगपणे गावगाडा हाकण्याचा मान मिळालेल्या या महिला सरपंचाला गावात राहण्यासाठी हक्काचे घरही नसल्याने त्यांचे सरपंचपद केवळ नामधारी ठरले आहे. शासन प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी अनेक योजना राबवित असताना अज्ञानपणामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे एका महिला सरपंचालाच हक्काचे घर मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.कुर्नोली (ता. इगतपुरी) येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने या गावात राहणारे पांडुरंग तेलम यांच्या कुटुंबातील महिलेला सरपंचपदाचा मान मिळतो. त्यांच्या पत्नी वेणूबाई ऊर्फ सोनूबाई पांडुरंग तेलम या गेली पंचवीस वर्षांपासून गावच्या सरपंचपदी विराजमान आहेत. सरपंचपद मिळाल्यानंतर या कुटुंबाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. डोंगर रानात वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबाला गावालगत शासकीय योजनेतून एखादा निवारा मिळेल, अशी माफक अपेक्षा होती. मात्र या अपेक्षांचा पंचवीस वर्षांपासून चुराडा होत आहे. शासकीय योजनेतून साधे घरकुलही मिळत नसल्याने अखेर या कुटुंबाने गावालगत असलेल्या दुसऱ्याच्या खासगी जागेत लाकडाची झोपडी उभारली आणि आपल्या निवाऱ्याची सोय केली आहे. गावालगत झालेल्या वाकी खापरी धरण क्षेत्रात या कुटुंबाची सर्व जमीन जाऊन हे कुटुंब भूमिहीन झाले आहे. त्याचे अनुदानही शासनाकडून येणे बाकी आहे. अशा अवस्थेत हे कुटुंब जीवन जगत आहे. विशेष म्हणजे गाव पातळीवरील सर्वोच्च पद असतानाही या कुटुंबाला शासनाच्या उदासीनतेमुळे एक घरकुलही मिळत नसल्याने या पदाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
गावचे सरपंचपद मिळाल्यानंतर आपल्याला किमान निवाऱ्यासाठी एखाद्या शासकीय योजनेतून घरकुल मिळेल, अशी माफक अपेक्षा होती. याबाबत आपण सातत्याने पाठपुरावाही केला; मात्र कोणीही दखल घेतली नाही. - वेणूबाई तेलम सरपंच, कुर्नोली