नाशिक : प्रभाग क्रमांक ३ मधील सुमारे दीड हजार नावे हे प्रभाग क्रमांक दोनमध्ये घुसविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दोन समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची पत्ते मतदार यादीवरून गायब असल्याने सदर प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप सचिन अहिरे आणि ज्ञानेश्वर सोमासे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली असून, धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर, अमृतधाम परिसरातील सुमारे १,४६२ नावे प्रभाग क्रमांक दोनमधील यादी क्रमांक ६६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की यादीचा भाग क्रमांक ६६, प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नावे अनुक्रमांक १५,६९७ ते १६,७४६ म्हणजेच एकूण १०४९ व अनुक्रमांक ३२,४७९ ते ३२,८९२ असे ४१३ असे एकूण १४६२ नावे प्रभाग क्रमांक दोनमधील ६६ क्रमांकाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या यादीतील रहिवासी हे प्रभाग क्रमांक ३ मधील अमृतधाम परिसरातील असल्याचा दावा अहिरे, सोमासे यांनी केला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सदर नावे प्रभाग क्रमांक ३ मध्येच असताना यंदा मात्र नावे बदलाचा घाट घालण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. येत्या चार दिवसांत सदर नावे पुन्हा प्रभाग ३ मध्ये समाविष्ट न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल.प्रभाग क्रमांक तीन मध्ये नावे असताना प्रभाग २ मध्ये नावे समाविष्ट झाल्याने येथील मतदारांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील काहींची नावे ही प्रभाग तीनमध्ये तर काहींची नावे प्रभाग २ मध्ये असल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
1,500 मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात
By admin | Published: January 16, 2017 1:20 AM