नांदगाव : नांदगाव (११३) व नाशिक(१२३) या क्रमांकाच्या दोन विधानसभा मतदारसंघात नावे नोंदवून, मतदानाचा हक्क दोन्ही ठिकाणी बजावणारे पती-पत्नी यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी फुलेनगरच्या अमोल जेजुरकर यांनी केली आहे. तालुक्यातील फुलेनगर येथील मूळ रहिवासी असलेले सुदाम खैरनार सध्या नाशिक पंचवटी येथे वास्तव्यास आहेत. ते व त्यांची पत्नी अरुणा खैरनार यांची नावे उपरोल्लिखित दोन्ही मतदार याद्यांमध्ये आहेत. यासंदर्भात नांदगाव तहसीलदार यांच्याकडे दि. ८ फेब्रु. २०२१ रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता; मात्र कारवाई न झाल्याने आपले सरकार प्रणालीतून जेजुरकर यांनी तक्रार केली. त्यान्वये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक या कार्यालयाने या तक्रारीबाबत कारवाई करून माहिती सादर करण्याचे आदेश मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नाशिक (१२३ नाशिक पूर्व), मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रो. ह. यो.) नाशिक (११३ नांदगाव) यांना दिले आहे. प्रस्तुत प्रकरणी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० कलम १८ व ३१ नुसार एक वर्षाची कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हा दावा दाखल करण्याचा अधिकार मतदार नोंदणी अधिकारी यांना आहे.
--------------------
चार महिन्यात पुलाला भगदाड
नांदगाव : मोरझर पिंजारवाडी रस्त्यावरील लेंडीनदीवरील फरशी पुलाचे काम निकृष्ट झाले असून चार महिन्यात पुलाला भगदाड पडले आहे. या बाबत तक्रार शिवसेनेचे अशोक चोळके यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. मोरझर ते पिंजरवाडी रस्त्यावर लेंडीनदीवरील फरशी पुलाची जुनी मागणी होती. ती पूर्ण झाली. पण चार महिन्यातच पुलाला तडे जाऊन भगदाड पडले आहे. मोरझर ते पिंजारवाडी जाण्यास हा एकमेव मार्ग असून रात्री अपरात्री शेतकरी, शेतमजूर यांचा वावर या मार्गावरून असतो. पुलाचे नव्याने काम करावे आणि निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी चोळके यांनी केली आहे. हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत झाले आहे.