नानावली परिसरात मुस्लीम समाजाकरिता दफनविधीच्या आरक्षित जागेसाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी विकास आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. यानुसार या जागेवर दफनविधीला परवानगी मिळावी आणि महापालिकेचे मुस्लीम समाजाकरिता नानावली कब्रस्तान कार्यान्वित व्हावे, अशी मागणी नगरसेवक समीना सय्यद, मुशीर सय्यद, शाहीन मिर्झा यांनी मनपा प्रशासनाकडे केली होती. तसेच कोरोनामुळे लॉकडाऊन काळात जुने नाशिक, वडाळागाव या भागातील मुस्लीम समाजाच्या खासगी कब्रस्तानमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भेट देत नानावली कब्रस्तान तातडीने अस्तित्वात आणून त्या ठिकाणी दफनविधीला परवानगी मनपा प्रशासनाकडून मिळावी, अशी मागणी केली होती. यानुसार मनपाने येथील कब्रस्तानबाबत ठराव मंजूर केला; मात्र दोन महिने उलटत नाही तोच अचानकपणे हा ठराव प्रशासनाने रद्द केल्याने मुस्लीम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, हा ठराव पुन्हा मंजूर केला जावा आणि आरक्षित जागेवरील कब्रस्तानचा मार्ग मोकळा करावा, यासाठी कृती समितीचे माजी उपमहापौर गुलाम शेख, सचिव फय्याज पठाण, रफिक शेख, हाजी बबलू पठाण, नदीम मनियार, रियाज मेमन आदींनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात भेट देत निवेदन सादर केले. तसेच या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनाही देण्यात आली आहे. निवेदनावर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नानावली कब्रस्तानप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:13 AM