नांदगाव : विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रंगणार असल्याचे चित्र आहे.गेल्या निवडणुकीत ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत तब्बल २८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र आज अर्ज माघारीच्या दिवशी १३ जणांनी माघार घेतली. यापूर्वी पंकज भुजबळ शिवसेनेत जाणार म्हणून राष्ट्रवादीच्या तिकिटावर डोळा ठेवणाऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा भुजबळ हॅट्ट्रिक साधणार का? या चर्चेला शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी मोठे आव्हांन उभे केले आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपतील इच्छुकांनी माघार घेत कांदे यांचा मार्ग प्रशस्त केला. मात्र यात गिरीश महाजन यांचे निकटवर्ती रत्नाकर पवार यांनी अर्ज मागे न घेतल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. आता प्रमुख लढत पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष), सुहास कांदे (शिवसेना) व रत्नाकर पवार (अपक्ष) या तिघांमध्ये होईल, असा अंदाज आहे.रिंगणातील उमेदवार...गोविंदा बोराळे (बसपा), पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), सुहास कांदे, (शिवसेना), राजेंद्र पगारे (वंचित बहुजन आघाडी), विशाल वडघुले (आम आदमी पार्टी), अशोक पाटील (अपक्ष), सुदर्शन कदम (अपक्ष), भगवान सोनवणे (अपक्ष), पुंडलिक माळी (अपक्ष), सौ. मंगल अमराळे (अपक्ष), रत्नाकर पवार (अपक्ष), राहुल काकळीज (अपक्ष), शमीम सोनावाला (अपक्ष), सुनील सोनवणे (अपक्ष), संजय सानप (अपक्ष)
नांदगाव : युती, आघाडीतच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:35 AM