मालेगाव : सततची नापिकी, कांदा, कापूस व डाळिंबावर आलेली रोगराई, विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, महाराष्टÑ बॅँकेचे वडिलांच्या नावावर असलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील भूषण दगा ठोके (२८) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. ठोके हे आई-वडील व तिघे भाऊ व पत्नी, मुले अशा एकत्रित कुटुंबात राहत होते. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली होती. शेतात लावलेले कांदा, कापूस, डाळिंब पिकांवर रोगराई आली होती. त्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे शेती पिकांना पाणी देणे शक्य नव्हते. महाराष्टÑ बॅँकेकडून वडिलांच्या नावावर असलेले तीन लाखांचे कर्ज ठोके यांनी घेतले होते. या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून त्यांना नैराश्य आले. त्यांनी नांदगाव शिवारातील पीरसाहेब मंदिराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, पत्नी, दोन मुलगे, तीन भाऊ असा परिवार आहे. येथील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली आहे.
नांदगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:23 AM