मनमाड : नांदगाव आणि मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत प्रचंड निरुत्साह दिसून येत आहे, हे योग्य नाही. याबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस घेण्याचे प्रमाणही कमी आहे. याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले याबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शहर आणि परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगरपालिका ही प्रशासनही सज्ज झाले.
शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ नगरपरिषदेच्या ७ पथकाने शहरातील विविध भागात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सूचना करत दंडात्मक कारवाई सुरू केली. दरम्यान, तालुक्यासह मनमाड शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असली, तरी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे आणि मृत्यू नाही, ही बाजू जमेची असली तरी रुग्णवाढ होऊ शकते त्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मांढरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना दिली.कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक सूचना आणि नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, लसीकरणाला जगभर मान्यता मिळाली असून, लसीकरण हे सुरक्षित जीवनाची खात्री आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना झाल्यास तो चार-पाच दिवसांत पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे सुरक्षा कवच आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले.नांदगाव येथील बैठक आटोपून जिल्हाधिकारी मांढरे हे मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात आले. तेथे त्यांनी येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, मनमाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांच्याशी कोरोनापरिस्थितीच्या संदर्भात आढावा घेऊन चर्चा केली.