सकाळी ११वा. शेकडोंच्या संख्येने रेल्वे स्टेशनवर जमा झालेल्या नागरिकांनी, नजीकच्या काळात रद्द केलेले थांबे सुरू केले नाही, तर शहरवासीयांची सहनशीलता संपुष्टात येईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आमदार सुहास कांदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. स्टेशन प्रबंधक विश्वजीत मीना यांना कांदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. थांबे रद्द केल्यामुळे असंतोष धुमसत असतांनाच्या काळात, रेल्वे फाटकाला पर्यायी सबवे देताना, त्याची बांधणी वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यामुळे नाराजी निर्माण झाली व त्यात फाटक एकदमच बंद केल्याने ठिणगी पडली. गांधी चौकात सकाळी ११वा. शेकडो नागरिक जमले. राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून सर्वांनी रेल्वे स्टेशनकडे कूच केले. तत्पूर्वी संतोष गुप्ता यांनी मोर्चाला संबोधित केले. रेल्वे प्रवासाची मोठी गैरसोय झाल्याने, नागरिकांची मन:स्थिती दुसऱ्या गावी राहायला जाण्याची झाली आहे. गाड्या थांबविण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितला नसून, ती जबाबदारी केंद्राची आहे. अन्याय होणार असेल, तर मी नांदगावकर म्हणून जनतेच्या बाजूने उभा आहे, प्रसंगी लोकशाही मार्गाने रुळावर झोपून आंदोलन करावे लागले, तरी करेन, अशी याची ग्वाही आमदार कांदे यांनी दिली.मोर्चा संपल्यावर खासदार भारती पवार यांचे येथील शासकीय विश्राम गृहात आगमन झाले. त्यांनी थांबे सुरू करण्यासाठी असलेल्या कोविड तपासणीविषयीच्या अडचणी मांडून सध्या सुरू असलेल्या गाड्या स्पेशल गाड्या आहेत. प्रवासी संख्येचा निष्कर्ष प्रशासनाने थांब्यासाठी लावला, तरीही माझा पाठपुरावा सुरू असून, सकारात्मक उत्तराची अपेक्षा असल्याचे सांगितले. मात्र, त्यास उपस्थित नागरिकांनी तीव्र विरोध केला. यावेळी पवार यांनी सात गाड्यांपैकी कोणत्याही दोन एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळवून देण्याची तयारी दाखविली. महानगरी, काशी व कामायनी अशा तीन गाड्यांचे थांबे द्यावेत, अशी मागणी सुमित सोनवणे यांनी केली.
रेल्वे फाटक सुरु करण्याच्या मागणीसाठी नांदगावी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 8:55 PM
नांदगांव : रेल्वे स्टेशनवरच्या प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ सात थांबे कोविडच्या निमित्ताने बंद केल्याने, तसेच अरुंद भुयारी पूल, बंद झालेले रेल्वे फाटक, यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मी नांदगावकर या निशाणाखाली एकत्र येऊन, बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत, १०० टक्के बंद पाळत मोर्चा काढला.
ठळक मुद्देबंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : फाटकाला पर्यायी व्यवस्थेची मागणी