नांदगाव : शहराला होणारा पाणीपुरवठा नगरपरिषद व जिल्हा परिषद यांच्यातील बिल भरण्याच्या वादातून नेहमीच चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वी थकीत बिल भरले नाही तर पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दिल्यानंतर मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी व्याजासह ८६ लक्ष १२ हजार रु पये भरल्याने आता तरी काही काळ धमक्यांचे ‘बिल फाडले जाणार नाही.’ अशी अपेक्षा नगरसेवक व्यक्त करत आहेत. दरम्यान नगरपरिषद व जिल्हा परिषदेत झालेल्या कराराची आठवणही नगरपरिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेला करून दिली आहे.करारातील मुद्यानुसार जिल्हा परिषदेने शुध्द पाणीपुरवठा करावयाचा आहे. पाण्याचे आवर्तन चार दिवसांनी व्हायला हवे. तसेच पाणी मीटर बसवून त्याने केलेल्या मोजमापानुसार पाणी नगरपरिषदेला पुरवायचे आहे. यातील एकही अट जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाळली जात नसल्याचे उपलब्ध नोंदींवरून दिसून येत आहे. नेमके यावरच देवचके यांनी बोट ठेवले असल्याने आता चेंडू जीपच्या कोर्टात गेला आहे. ८६ लाख १२ हजाराची एवढी मोठी पाणीबिलाची रक्कम नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच भरली गेली आहे. याची चर्चा लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये सुरु आहे. नगरपरिषद व जिल्हा परिषद यांच्यात वाद उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांचा निर्णय मान्य करावा असे करारात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा हवाला रक्कम भरतांना नेहमी देण्यात येतो. पाणी पुरवठ्याचा प्रमाणित केलेला दर ३रूपये ४० पैसे प्रतिहजार लिटर असा आहे. त्यानुसार देवचके यांनी वरील रक्कम भरली आहे.
नांदगाव नगरपरिषदेने भरले ८६ लक्ष रुपये थकीत पाणीबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 4:17 PM
जिल्हा परिषदेला करून दिले करारनाम्याचे स्मरण
ठळक मुद्देकरारातील मुद्यानुसार जिल्हा परिषदेने शुध्द पाणीपुरवठा करावयाचा आहे