नांदगाव : शनिवारच्या (दि. २१) रात्री येथील चार मंदिरांच्या दानपेट्या फोडण्यात आल्या असून, सर्व मंदिरे मिळून ४२ हजार रुपये चोरी गेले आहेत. आधी टेहाळणी व नियोजन करून या चोऱ्या झाल्या आहेत. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधीसुद्धा शहरात अशाच प्रकारे चोऱ्या झाल्याची नोंद आहे. स्टेट बँकेमागील नांदेश्वर महादेव मंदिरात सकाळी दर्शनासाठी गेलेल्या रेखा पोटे यांना मंदिरात दानपेटी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मंदिराशेजारील विशाल अग्रवाल यांना कळविले. दानपेटीचा शोध घेतला असता ती थोड्या अंतरावर असलेल्या स्टोअर रूमच्या बाहेर मिळून आली. रूमचा दरवाजा तोडून आतमधील लोखंडी कपाट फोडण्यात आले होते. दानपेटीत सात ते आठ हजार रुपये असावा, असा अंदाज योगेश सरोदे यांनी व्यक्त केला. सुटी नाणी पेटीत सोडून फक्त नोटा घेऊन चोरटे पसार झाले. याआधी उरुस जत्राप्रसंगी संध्याकाळी आठ वाजता शहरातील काही तरुण पेटी फोडून, त्यातले पैसे पिशवीत भरण्याच्या तयारीत असताना, त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची आठवण भावसार यांनी सांगितली. सुमारे सात वर्षांपूर्वी येथे असाच प्रकारची चोरी झाली होती. शहराच्या सीमेवरील मल्हारवाडीचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या मंदिरातही चोरी झाली. गाभाऱ्यातील पेटी सभामंडपात मिळून आली. सकाळी देवराम खैरनार यांच्या लक्षात ही घटना आली. तसेच चांडक प्लॉटमधील राम मंदिरातही वरील प्रकारे चोरी झाली. येथील रोख रक्कम काही हजार असल्याची माहिती आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीपुढील त्रिशूळ व डमरु खंडेरावाच्या मंदिराजवळ टाकून दिलेले आढळून आले. नाशिकच्या श्वान पथकातील टॉमी या श्वानाला चोरी झालेल्या सर्व मंदिरांमध्ये नेण्यात आले. परंतु तो परिसरातच घुटमळला. पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे, पोलीस निरीक्षक अरुण निकम, महेश महाले पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)
नांदगावला अनेक मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला
By admin | Published: January 22, 2017 11:33 PM