नांदगाव : रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठरली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून प्रशासकीय व राजकीय अनास्थेने तिचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी मुलींना घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनासाठी रेल्वे लाईन ओलांडताना स्वाती रवींद्र शिंदे (३०) या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाला. स्वातीच्या मृत्यूने संतप्त शेकडो नागरिकांनी रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन प्रबंधक विश्वजित मीना यांना दोन तास धारेवर धरल्याने तणाव निर्माण झाला. ठोस आश्वासन मिळाल्यावरच स्वातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली. नागरिक आणि रेल्वे प्रशासन यांच्यात तोडगा काढतांना, सब वे मधले पाणी उपसण्यासाठी पंप गरजेनुसार सातत्याने सुरू राहतील. अप व डाऊन या दोन्ही लोहमार्गावर पादचारी क्रॉसिंगच्या ठिकाणी गाडी येण्याचा इशारा देणारे बझर सात दिवसात कार्यान्वित करण्यात येतील. क्रॉसिंगच्या जागी रेल्वे पोलीस तैनात करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मीना यांनी दिले.
पूर व नियोजनशून्य सब-वे मुळे शहराचे विभाजन झाले असून दैनंदिन गरजांसाठी दोन्ही बाजूंकडे आवागमन करणाऱ्या दहा हजार नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे सब-वेत पाणी भरल्याने शहरात येण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणे हा एकमेव पर्याय उरला आहे. दुसरा पर्याय चार कि.मी. लांबीचा आहे. घटना घडली तेव्हा अपकडे मालगाडी जात होती. रूळ ओलांडण्याची वाट बघत असलेली स्वाती आपल्या निकिता (१४), नंदिनी (१०), साक्षी (८), सोनू (५) यांना पलीकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होती. मागचा डबा गेल्याबरोबर तिने डाऊन लाईनवरून मुलीना पास केले. शेवटी सोनूला घेऊन जात असताना अंगावर येणाऱ्या गाडीला चुकविण्यासाठी तिने सोनूला अक्षरश: पलीकडे ढकलले. त्याचक्षणी कर्दनकाळ बनून आलेल्या गाडीचा जोरदार फटका बसून ती कोसळली. तिच्या समवेत सुवर्णा मोरे होती. आधीच गेल्याने ती बचावली. प्रत्यक्षदर्शी नगरसेवक नितीन जाधव व सोमनाथ घोंगाणे सेवाग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.
गाडी येत असताना बघून अनेकांनी आरडाओरडा करून स्वातीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु मरणाच्या दारात पोहोचलेल्या स्वातीला तो आवाज ऐकूच आला नाही. दुकानात काम करणारा व रिक्षाने विद्यार्थी पोहोचवणारा तिचा पती रवींद्र शिंदे याचा आक्रोश सर्वांचे मन हेलावून गेला. मुलींच्या दु:खाला पारावार उरला नाही.
इन्फो
केंद्रीय मंत्री पवार यांच्याकडून कानउघाडणी
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मोबाईलवरून संपर्क साधून कडक शब्दात प्रबंधक विश्वजित मीना यांची कानउघाडणी करून त्यांना नागरिकांची सोय तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. मीना यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत महावीर जाधव, विश्वास अहिरे, सुनील जाधव, भरत पारख, शंकर विसपुते, तुषार पांडे, सुनील सोर, सुनील नेग्णार, दत्तू आवारे, सौदागर आदींनी भाग घेतला.