नांदगाव लवकर निदान लवकर उपचार नजरेसमोर ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत ग्रामीण भागात व्यापक सर्व्हेक्षण मोहीम बुधवारी (दि.२८) सुरू करण्यात येत असून तालुक्यातील ३७ हजार ९२९ कुटुंबांचा सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत असून, बाधितांचे निदान लवकर झाले तर रुग्णांचे प्राण वाचविता येतील. तसेच विलगीकरणातून संसर्ग वाढीस आळा बसेल या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी ९२ पर्यवेक्षक, १८४ पथके, व ६१८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती व शिक्षकांचा आरोग्य पथकात समावेश असणार आहे. एक पथक दररोज ५० ते १०० घरांना भेटी देणार आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान, ऑक्सिजन पातळी, पल्सरेट बघून ताप, खोकला, दम लागणे आदी लक्षणांची चिकित्सा करून संशयित रुग्णांची अँटिजेन व आरटी पीसीआर तपासणी करण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचेकडे देण्यात आली आहे. पथकास लागणारी पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, नोंदवही आदी साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे.