साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे महिनाभरात दोन शेतक-यांनी रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी (दि.१७) दुपारी १२ वाजता पुन्हा साकोरा येथील युवकाने नाशिक रेल्वेस्थानकादरम्यान परिस्थितीला कंटाळून रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. मयत विशाल शेवाळे हा महाराष्ट नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा नांदगाव शहर अध्यक्षपदी कार्यरत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकोरा येथील विशाल शशिकांत शेवाळे (वय २४) या युवकाने परिस्थितीला कंटाळून नाशिक येथे रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. विशाल शेवाळेच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती. अशा स्थितीतीही त्याने डीएडची पदवी घेतली होती. सिन्नर येथील के. एस. बी. पंप या खाजगी कंपनीत काम करून तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातून बाहेरून पुढील शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याची नांदगाव तालुका मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. दरम्यान, पंधरा दिवसांपासून कंपनीने त्याला ब्रेक दिला असल्याने तो अतिशय निराश दिसत होता. त्याबाबतच्या संवेदनाही त्याने आपल्या काही मित्रांजवळ बोलून दाखविल्या होत्या. त्याच्या पश्चात आई, वडिल व लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात साकोरा येथील मच्छिंद्र बोरसे आणि सुनिल बोरसे या दोन शेतकºयांनी कर्जाला तसेच आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली होती. आता सलग तिसरी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनविसेच्या नांदगाव तालुका अध्यक्षाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:46 PM
रेल्वेखाली उडी : साकोऱ्यात महिनाभरात तिसरी घटना
ठळक मुद्देनाशिक रेल्वेस्थानकादरम्यान परिस्थितीला कंटाळून रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या