लासलगाव : १६ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमधमेश्वर धरणातील मृत पाणीसाठा संपुष्टात आल्याने दारणा धरणातून त्वरित पाणी सोडावे तसेच संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लासलगाव परिसराची पाहणी करून पाण्याचे टँकर्स सुरू करावेत, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, सरपंच संगीता शेजवळ यांनी केली आहे.लासलगावसह या योजनेवर अवलंबून असणाऱ्या १६ गावांमध्ये होणारा पाणीपुरवठा धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आल्याने बंद पडला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडावे, अशी मागणी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन व नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेत लासलगाव व विंचूर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश असून, त्यात बाजारपेठेमुळे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत असतो. पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. या गावांना नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याशिवाय दुसरा कोणताही पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. (वार्ताहर)
नांदूरमधमेश्वर : १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद
By admin | Published: May 25, 2016 10:30 PM