नाशिक : राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल शुक्रवारी (दि. १६) ऑनलाइन जाहीर झाला असून, यावर्षीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या स्थानावर असलेल्या नाशिक जिल्ह्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून, गतवर्षी चौथ्या स्थानी असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोरोनामुळे दहावीची लेखी परीक्षा होऊ न शकल्याने यावर्षी शासन निर्णयानुसार मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागांतील निकालाची टक्केवारी थेट ९९ पार पोहोचली असून, नाशिक जिल्ह्यातून ४९ हजार ४२७ मुले व ४३ हजार ७८३ मुलींसह ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर विभागातून २ लाख ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात नंदुरबार जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.९९ टक्के निकाल लागला आहे. यात ११ हजार ३२५ मुले व ९७८४ मुलींचा समावेश आहे. धुळ्यात १६ हजार ११४ मुले व १२ हजार ४४७ मुलींसह ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावचा ९९.९४ टक्के निकाल लागला असून, यात ३३ हजार ४७८ मुले व २४ हजार ७७१ मुलींचा समावेश आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे २०२१ दरम्यान दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ एप्रिलच्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, कोरोना आटोक्यात येत नसल्याने १२ मे रोजी परीक्षा रद्द करून मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला. लवकरच विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची दहावीची नियोजित परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयानुसार मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर करण्यात आला. यात नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन व अंतिम तोंडी/प्रात्यक्षिकांच्या आधारे शाळांमार्फत विद्यार्थांना विषयनिहाय गुण देण्यात आले. त्यामुळे दहावीचा यंदाचा निकाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील सर्वाेच्च निकाल ठरला आहे.
------
विभागात मुलींची बाजी
जिल्हा - टक्केवारी - मुले -मुली
नाशिक - ९९.९७ - ९९.९६ - ९९.९७
धुळे - ९९.९८ - ९९.९८ - ९९. ९८
जळगाव -९९.९४ -९९.९५ - ९९.९३
नंदुरबार -९९.९९ - ९९.९८ - १००
विभाग -९९.९६ - ९९.९६ -९९.९६
-------