नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असताना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक
या गावांमध्ये मात्र कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन महसूल, पोलीस, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त कारवाईस सुरुवात केलेली आहे. नांदूरशिंगोटे व परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक मोहीम राबवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार राहुल कोताडे, सहायक पोलीस निरीक्षक, सागर कोते, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. मोहन बच्छाव, नायब तहसीलदार, ललिता साबळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नांदूरशिंगाेटे येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना इंडिया बुल वसतिगृह येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गृहविलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींची घरी जाऊन पाहणी करण्यात आली. गृहविलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना इंडिया बुल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदूरशिंगोटे येथे एकूण १५७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून बाधित आढळून आलेल्या ४ व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना चाचणीसाठी डॉ. नितीन म्हस्के व डॉ. राहुल हेंबाडे यांच्या पथकाने कार्यवाही केली. प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये ३ पेट्रोलपंपांवरही कार्यवाही करण्यात आली असून एकूण ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
-----------------------
नियम पाळणे बंधनकारक
नांदूरशिंगोटे व दोडी येथे केलेल्या तपासणीमध्ये सर्व आस्थापनाचालकांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे व असे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या परिसरात कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आरसीएफच्या २५ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत कोरोना नियमांचे पालन न करणारे व विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींची वाढती संख्या, मृत्यूचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या संसर्ग विचारात घेता सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.