नांदूरशिंगोटे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नांदूरशिंगोटे येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच कविता सानप यांनी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून अंशतः लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. लाॅकडाऊनचे नियम पुन्हा कडक करण्यात आले आहेत. आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो, त्यामुळे भाजीपाला व अत्यावश्यक सेवा वगळता बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडा बाजार भरविण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच शेळके व उपसरपंच सानप यांनी केले आहे.
इन्फो...
वर्षभरानंतर पुन्हा आठवडा बाजार बंद
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दिनांक १९ मार्च २०२०पासून आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले होते. गेल्यावर्षी सर्वांनाच कोरोनाचा फटका बसला होता. तब्बल आठ ते नऊ महिने आठवडा बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. दीपावलीच्या सणानंतर जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर आठवडा बाजार सुरु झाले होते. मात्र, आता मार्चच्या सुरुवातीला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचा फटका आठवडा बाजारांना बसला आहे.