नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवाशी आदींसाठी गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासह मुंबईकडून येणाऱ्या तसेच इगतपुरीतून पायी प्रवास करीत निघालेल्या अनेक परप्रांतीय मजुरांनाही भोजन देऊन पुढे मार्गस्थ करण्यात आले. दिवसभरात या उपक्र मातून ७०० पेक्षा अधिक गरजू नागरिकांनी लाभ घेतला. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शाम सोनवणे, परदेशी, सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे यांनी हा उपक्र म सुरू केला.. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, दुकाने बंद आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवेची वाहने आणि त्यावर काम करणाºया वाहनधारकांना जेवण तसेच पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. हे भयाण चित्र पाहून गोंदे दुमाला येथील निलेश नाठे, संजय अमृता नाठे, निवृत्ती नाठे , सुरेश बोडके, संदिप नाठे, शरद नाठे, खंडू नाठे, कजरी स्वीट्स, प्रकाश नाठे, श्रीराम स्वीट्स, केशव नाठे, शंकर राव, निलेश चोरडिया, मोहन शिंदे, काळू सोनवणे, भीमसेन सोनवणे, योगेश नाठे, रतन नाठे, रमेश सातपुते, हिरामण नाठे, विकास भागवत यांनी सहभाग घेऊन भोजन व पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तांदूळ, भाजीपाला, पाण्याची वर्गणीतून व्यवस्था करून महामार्गावर भोजन बनवण्यात आले. मुंबई -आग्रा महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळी भोजनाचे नियोजन केले. ७०० पेक्षा अधिक गरजू नागरिकांनी भोजन आणि शुद्ध पाण्याचा लाभ घेतला. हा उपक्र म राबवत असतांना सोशल डिस्टन्स, साबणाने हात धुणे आणि संचारबंदी कायद्याचे कटाक्षाने पालन करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी हिरामण जाधव, जनार्दन नाठे, गणेश शेळके, दत्तू नाठे, भाऊसाहेब कातोरे यांनी प्रबोधन केले.
महामार्गावरील ७०० पांथस्थांना गोंदे दुमाला ग्रामस्थांकडून भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 4:08 PM