नांदुरवैद्य -: येथील साई मित्रमंडळाच्या दहाव्या नांदुरवैद्य ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. पदयात्रेत साधारणतः दोनशे साईभक्त सहभागी झाले. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर भैरवनाथ मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोलताशाच्या गजरात सुरुवात करण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये सुंदर असे नृत्य सादर करणा-या अश्वांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर्षी या पदयात्रेत जवळपास ८० ते ९० महिलांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत साई पालखी पदयात्रेचा आनंद घेतला. यानंतर साई पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी परिसरातून तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. यानंतर ओम साईराम, साईबाबा की जय... अशा गजरात पालखीचे पुढील मार्गाकडे प्रस्थान करण्यात आले. पालखी ३१ जानेवारीला सायंकाळी शिर्डीमध्ये पोहोचणार असून या दरम्यान शेणित, साकुरफाटा, लोणारवाडी, मुसळगाव, सिन्नर, वावी आदी ठिकाणी वस्ती होणार आहे. या पालखी सोहळ्यात पहाटे ६, दुपारी १२, सायंकाळी ६ व रात्री १० अशी चारवेळा आरती तसेच भजन घेण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारीला सायंकाळी साईंचा दर्शन सोहळा पार पडल्यानंतर दुस-या दिवशी २ जानेवारीला साईभक्त नांदुरवैद्य येथे परतणार आहे. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर काजळे, देविदास काजळे, शिवाजी काजळे, नवनाथ कर्पे, डॉ. संदीप वायकोळे, दीपक जोशी, गणेश मुसळे, हिरामण शिंदे, संतोष मुसळे, विजय भोर, सुभाष मुसळे, मुन्ना आवारी, आचारी अशोक काजळे, रामा काजळे आदी विशेष मेहनत घेत आहेत.