नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:50 PM2024-07-28T17:50:46+5:302024-07-28T17:52:52+5:30
नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
Narhari Zirval ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराचा सिलसिला सुरू झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ हे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे. तसंच काही दिवसांपूर्वी त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ हेदेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने या चर्चेला आणखीनच बळ मिळालं होतं. अशातच आज स्वत: नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा जागांचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अजित पवार गटाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र नरहरी झिरवळ हे अनुपस्थित असल्याने त्यांच्या मनात नक्की चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीतील अनुपस्थितीबाबत अद्याप नरहरी झिरवळ यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला नाही. ते या गैरहजेरीचं नक्की काय कारण देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गोकुळ झिरवळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे भूमिका
नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित राहिले होते. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना गोकुळ झिरवळ म्हणाले होते की, " आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणले. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायला हवे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता. माझ्या वडिलांची निष्ठा अजित पवारांवर आहे. कुटुंब व्यवस्था वेगळी आणि राजकारण वेगळं आहे. त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. मात्र माझ्या वडिलांनीही आता शरद पवार यांच्याकडे यावं," अशी साद गोकुळ झिरवळ यांनी घातली होती.