नामदेव भोर नाशिकप्रभाग तसा भाजपाला अनुकूल, परंतु त्याचमुळे इच्छुकांची संख्याही अधिक आणि त्यामुळे नाराजीही भरपूर. अशा स्थितीत नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान भाजपासमोर उभे आहे. विशेष म्हणजे या प्रभागात भाजपाचे तीन आमदार असून, साहजिकच या तीन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये अगोदरच्या प्रभाग रचनेनुसार आमदार सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर तर दुसऱ्या प्रभागात भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे विद्यमान नगरसेवकही आहेत. साहजिकच आता या तिघांचा प्रभाग एकत्र झाला असल्याने या प्रभागात जे काही होईल ते आमदारच ठरवतील, असेच मानले जात आहे. तिन्ही आमदार भाजपाचे असल्याने त्यांचा उमेदवारी ठरविण्यात वरचष्मा आहे. त्यातही भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते (कै.) पोपटराव हिरे यांचे चिरंजीव योगेश ऊर्फ मुन्ना हिरे आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या घरातून त्यांच्या चुलत भगिनी हिमगौरी आडके- अहेर उमेदवार असल्याने त्यांच्या अस्तिवाचा आणि आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यातही हिमगौरी यांची ओळख ही आमदारांची भगिनी असली तरी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब अहेर तसेच माजी उपमहापौर शोभना अहेर यांची कन्या म्हणून अधिक आहे. अर्थातच, उमेदवारी देताना घराणेशाही जोपासल्याने भाजपात नाराजांची संख्या अधिक आहे. निवडणुकीत या प्रभागातून एकूण १८ जणांनी इच्छुक म्हणून दावेदारी केली होती, त्यातूनच स्पर्धा लक्षात येते. प्रभागात शिवसेनेचे विद्यमान महानगर प्रमुख आणि गटनेता अजय बोरस्ते हे नगरसेवक असल्याने त्यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा प्रभाग आहे. परंतु त्यांनी आपल्या जोडीला राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या तंबूतील उमेदवार दिल्याने तेथे मूळ शिवसैनिकही नाराज आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत, परंतु त्यापेक्षा लढत ही भाजपा- सेना आणि बंडखोरांमध्येच अधिक रंगणार आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील ड या सर्वसाधारण जागेसाठीची लढत सर्वाधिक लक्षवेधी असून, तेथे भाजपाचे योगेश हिरे, शिवसेनेचे गोकुळ पिंगळे आणि भाजपाचे बंडखोर मधुकर हिंंगमिरे यांच्यात प्रामुख्याने लढत दिसते आहे. मधुकर हिंगमिरे यांना गेल्यावेळी डावलण्यात आले होते आणि आता भाजपातील घराणेशाहीमध्ये कार्यकर्ता डावलला जात असल्याच्या नाराजीतून त्यांनी आव्हान दिले आहे. तर गोकुळ पिंगळे हे मूळचे राष्ट्रवादीचे असून, त्यांनी नगरसेवकपद भूषविले आहे. गेल्यावेळी भाजपाचे राहुल अहेर यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू म्हणूनही ते परिचित असून, साहजिकच या तिघांभोवती आज तरी निवडणूक चर्चेत ठरली आहे. याच प्रवर्गातून विनोद सोलंकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आनंद ढोली (धर्मराज्य पक्ष), रेशन जाधव (अपक्ष) व राकेश साळुंके (अपक्ष) निवडणूक रिंगणात आहेत.प्रभाग सातमधील अ या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी शिवसेनेचे अजय बोरस्ते यांना भाजपाचे नरेंद्र पवार आणि मनसेचे सत्यम खंडाळे यांचे आवाहन आहे. बोरस्ते यांच्या मूळ प्रभागापेक्षा हा प्रभाग विस्तृत आहे. शिवाय शरद देवरे, रवींद्र जाधव यांच्यासारखे जुने शिवसैनिक डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचे आव्हान बोरस्ते यांना पेलावे लागणार आहे. नरेंद्र पवार हे रविवार कारंजा हा मूळ प्रभाग सोडून गंगापूररोडवर आले आहेत. तथापि, भाजपाचा समप्रित मतदार ही त्यांच्यासाठी सर्वाधिक जमेची बाजू आहे. तर मनसेचे सत्यम खंडाळे यांच्या दृष्टीने प्रभाग बऱ्यापैकी नवीन आहे. प्रभाग सात ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, त्यात भाजपाच्या हिमगौरी आडके अहेर यांना सुनीता गुळवे (शिवसेना), राणी देवरे (मनसे) व सुवर्णा गटकळ (कॉँग्रेस) यांच्यात लढत आहे. सुनीता गुळवे या मूळच्या कॉँग्रेस घराण्यातील. (कै.) गोपाळराव गुळवे यांच्या स्नुषा तर संदीप गुळवे यांच्या पत्नी आहेत. कॉँग्रेसचे घराणे असलेल्या संदीप गुळवे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या राजकारणात पत्नीला उतरविले आहे. स्वत: संदीप गुळवे यांनी कॉँग्रेसकडून लढताना दोन वेळा पालिका निवडणुकीत पराभूत झाले होते. इगतपुरी तालुक्याच्या कर्मभूमीत मात्र त्यांना साथ लाभली आणि जिल्हा परिषदेत ते निवडूनही आले होते. अर्थात, महापालिका शिक्षण मंडळात त्यांनी सदस्यपदही भूषविले होते. क या सर्वधारण महिला गटात शिवसेनेच्या रंजना देसाई आणि भाजपाच्या स्वाती भामरे यांच्यात थेट लढत आहे. शिवसेनेचे शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजेंद्र देसाई यांच्या पत्नी असलेल्या रंजना देसाई प्रथमच निवडणूक लढवित असून, तेथे आमदार फरांदे यांच्या निकटच्या मानल्या गेलेल्या स्वाती भामरे दोन हात करणार आहेत. (प्रतिनिधी)
पक्षांतर्गत नाराजीत आमदार त्रयींचा कस
By admin | Published: February 10, 2017 12:34 AM