नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील तृतीय आणि अखेरची शाही पर्वणी पार पडल्यानंतर आता शहरातील पुरोहितांचे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येणार असून, येत्या ३० सप्टेंबरपासून नारायण नागबलीचे विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पुरोहित पद्माकरशास्त्री मुळे यांनी दिली.नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन पर्वण्या पार पडल्या. त्र्यंबकेश्वर याठिकाणी कालसर्पयोग, त्रिपिंडी याप्रमाणेच नारायण नागबली, नारायण बलीचे विधी केले जातात. प्रामुख्याने, नारायण नागबलीचा विधी हा जगाच्या पाठीवर केवळ त्र्यंबकेश्वर याठिकाणीच केला जातो. त्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील काही ठराविक पुरोहितांना निजामकाळापासून पौराहित्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पितृदोष घालविण्यासाठी नारायण नागबलीचा विधी करण्याची प्रथा आहे. सदर विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला देश-विदेशातून लोक येत असतात. त्यासाठी खास पॅकेजेस तयार करण्यात आलेली आहेत. त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण हे बव्हंशी अशा धार्मिक विधींवरच अवलंबून आहे. दरम्यान, १३ जुलैला त्र्यंबकेश्वरी आखाड्यांमध्ये ध्वजारोहण सोहळे पार पडले. तेव्हापासून त्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिने पुरोहितांनी नारायण नागबलीचे विधी बंद ठेवले होते. ज्याठिकाणी सदर विधी पार पाडला जातो तेथे आखाड्यांच्या साधूंचा निवास असल्याने पुरोहितांकडून विधी बंद करण्याचा निर्णय झाला होता. दोन महिन्यांच्या कुंभपर्वकाळात केवळ त्रिपंडी, कालसर्पयोगादी विधी पार पाडले गेले. आता पर्वणीकाळ संपुष्टात आल्याने बंद ठेवण्यात आलेले विधी पुन्हा सुरू होणार असून, येत्या ३० सप्टेंबरला पहिला मुहूर्त सांगण्यात आला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण पुन्हा एकदा गजबजणार आहे.
नारायण नागबलीचे विधी ३० पासून
By admin | Published: September 26, 2015 10:55 PM