नाशिक - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली, असा वारंवार दावा करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना महागात पडले आहे. दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी शनिवारी राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा नोंदवला. याबाबत नारायण राणेंनी प्रथमच भाष्य केलं. यावेळी, दिशा आणि तिच्या कुटुंबीयांबद्दलच वेगळंच सत्य माध्यमांसमोर मांडलं.
दिशा सालियन गेल्या अडीच वर्षांपासून रॉय नावाच्या एका मुलासोबत राहात होती. त्या मुलासोबत गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात दिशाचं लग्न होणार होतं. ती आई-वडिलांसोबत राहात नव्हती, आई वडिलांसोबत तिचं पटत नव्हतं. विशेष म्हणजे तिच्या आई-वडिलांना शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर घेऊन जातात, यावरुन शिवसेनेत घबराट असल्याचं दिसून येतं. दिशा सालियनवरुन सुशांतची केस उघडी झाली. याप्रकरणी लवकरच शिवसेनेचे बडे नेते जे आज मंत्री आहेत, ते आतमध्ये जातील, असे नारायण राणे यांनी म्हटले.
तसेच, तिच्या आई-वडिलांनी आमची बाजू घ्यायला हवी होती, कारण आम्ही तिच्यासाठी न्याय मागतोय, असेही राणेंनी म्हटले. शिवसेनेला वाटतं अशा केसेस करुन राणेंना त्रास होईल, पण नारायण राणे एखादं प्रकरण हाती घेतल्यास तडीला गेल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडे शिवसेनेचा चोपडा असून वेळ आल्यास मी तोही ओपन करेल, असा इशाराही त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला.
नुकसान झाल्याने दिशा निराश होती
दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल-मे २०२० दरम्यान दोन डील्स रद्द होऊन झालेल्या तोट्यामुळे दिशा निराश होती. तसेच तिला वेळोवेळी याबाबत समजावले होते. त्यानंतर जाहिरातीच्या शूटिंगच्या कामानिमित्त ४ जून रोजी मित्र रोहनसोबत त्याच्या मालाड येथील निवासस्थानी गेली. तेथेच ८ जून रोजी मित्र इंद्रनीलचा वाढदिवस साजरा केला. त्याच रात्री ८ वाजता दिशासोबत बोलणे झाले होते, असे तिच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.
राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दिशावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली, असे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देऊन समाज माध्यमांवर दिशाची प्रतिष्ठा व चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केली. त्यामुळे मुलीची बदनामी होत असून, आम्हाला सन्मानाने जगता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मालवणी पोलिसांनी कलम २११, ५००,५०४, ५०६ (२), ३४ सह ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.