नाशिक - नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या 13 सरपंचांना ह्यलोकमत सरपंच अवॉर्डह्णने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. 'जो गावची शान, त्याचाच हा बहुमान' असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने 'सरपंच अवॉर्डह्णचा अभिनव उपक्रम राज्यभर सुरू केला. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हा सोहळा मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील 'रॉयल हॉल'मध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, वनधिपती विनायकदादा पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील, अर्चना जतकर, बीकेटीचे अॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या गावाचे सरपंच नरेंद्र कोंडाजीराव जाधव हे ‘सरपंच आॅफ द इयर’ ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अवनखेड गावात त्यांनी भाडेतत्वावरील जागेतील ग्रामपंचायत कार्यालय स्वतंत्र वातानुकूलित प्रशासकिय इमारतीत स्थलांतरीत केले. विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीद्वारे शालेय बस सुरू केली. संपुर्ण गाव हगणदारीमुक्त केले. तसेच गटारद्वारे सांडपाण्याचे व्यवस्थापन केले. डस्टबीनचे गावात वाटप केले. जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले. अवनखेड गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणले. ग्रामपंचायत, जिप शाळा अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळवून दिले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने त्यांना ‘सरपंच आॅफ द इयर’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.