नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच टप्प्यातील राज्यस्तरीय महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकच्या तपोभूमीतून गुरूवारी (19 सप्टेंबर) होत आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांचे विमान काही मिनिटांपुर्वीच ओझरच्या विमानतळावर उतरले आहेत. तेथून ते सभास्थळाच्या जवळ हेलिकॉप्टरने येणार असून दीड किलोमीटरचा रस्ता प्रवास करून ‘कॅन्वॉय’ थेट तपोवनातील साधुग्राम येथील सभास्थळी अवघ्या काही मिनिटांत पोहचणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली. विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) ताफ्याने रंगीत तालीम पूर्ण करत सभास्थळाची चाचपणी बुधवारीच पुर्ण केली होती. बुधवारी दूपारपासून व्यासपीठासह संपूर्ण ‘डी-झोन’चा ताबा या दलाच्या कमांडोकडे आहे. या परिसरात पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी वगळता अन्य सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदी यांच्या सभेने होणार आहे. मोदी यांना 7 स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षाव्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, अहमदनगर, धुळे, जालना, सांगली, सोलापूर, पुणे यांसह सुमारे 12 शहरांमधून आलेल्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाने तपोवनसह साधुग्रामचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. मुंबई गुन्हे शोध श्वान पथकानेही सभास्थळाची कसून तपासणी केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे विशेष सुरक्षा दल (एसपीजी), मुंबईचे फोर्स-1 आणि विशेष सुरक्षा गटाचे (एसपीयू) कमांडो शहरात दाखल झाले आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सचे जवानदेखील बंदोबस्ताला राहणार आहे.
मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे 5 हजार पोलीस तपोवनात दाखल झाल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केले आहे. सुरक्षाव्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती घेऊन धातुशोधक यंंत्राने तपासून डोममध्ये प्रवेश दिला जात आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामदास पाटील, चंद्रकात पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या मंत्र्यांसह विविध खासदार, आमदार व्यासपिठावर उपस्थित झाले आहेत.