नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही देशभर प्रचारात व्यस्त आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश सोडून संपूर्ण देशात लक्ष देत आहे. देश चालविणाऱ्या सत्ताधारी मंडळींचीच संवेदनशीलता हरवली असून, शहिदांच्या हौतात्म्याचे काहीच वाटत नसल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाड यांनी सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवली.देशात दारू, गोमांस वाहून नेणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांची तपासणी होते, परंतु ३०० किलो आरडीएक्स वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी कशी झाली नाही, असा प्रश्नही कवाडे यांनी यावेळी उपस्थित केला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक अभियानातर्फे रविवारी (दि.१७) माजीमंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते जोगेंद्र कवाडे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया ११ जणांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुधीर तांबे होते. व्यासपीठावर निवृत्त अवर सचिव सोनलस्मीत पाटील, वीरमाता नीलाताई आमले, पुष्पा काळे, जगन्नाथ पाटील, डी. आर. पाटील आदी उपस्थित होते. कवाडे म्हणाले, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले ते कोणत्या जातीसाठी किंवा धर्मांसाठी नव्हे, तर राष्ट्रधर्मांसाठी शहीद झाले. भारत संतांचा, महापुरुषांचा देश आहे. परंतु, एका विशिष्ट समाज व्यवस्थेने बहुजन समाजातील संत आणि महापुरुषांनाही जातीच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. या व्यवस्थेमुळेच अनेक वर्षे देशाला गुलामगिरीत रहावे लागले असून, जाती व्यवस्थेचा अंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समतेचा उदय होणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधीर तांबे यांनीही देशातील वातावरण अस्वस्थ आणि मन भयभीत करणारे असल्याचे मत व्यक्त करतानाच समाजात द्वेश करणारी माणसेच या व्यवस्थेचे नेतृत्व करीत असल्याची खंत व्यक्त केली. जाणीव पुरस्कारार्थी जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे सिन्नर येथील शहीद केशव गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांच्यासह आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक चैताली काळे, जळगाव येथील निवृत्त शिक्षिका ताराबाई चव्हाण, निवृत्त कार्यकारीअभियंता बाजीराव पाटील, रायगडच्या पेण येथील उपविभागीय अधिकारी प्रतिमा बुदलवाड, धुळे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मविप्रचे संचालक डॉ. प्रशांत देवरे व निफाड नगरपरिषदेचे नगरसेवक देवदत्त कापसे यांना जाणीव पुरस्काराने सन्मान करण्यात आले.