नाशिक : नाशिककर सायकलिस्ट किशोर काळे आणि संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलिस्टने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाशिकचे दोघे आणि उत्तराखंडमधील दोघांनी ही रेस पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. १ सप्टेंबर रोजी झालेल्या टूर आॅफ ड्रॅगनच्या नवव्या आवृत्तीत जगभरातून एकूण ३५ सायकलिस्टने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी १७ तासांत तर विजय काळे यांनी १८ तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणाऱ्या दोघा सायकलिस्टचा सत्कार भूतान आॅलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येतो.सायकलिंगचे कॅपिटल होऊ बघणाºया नाशिक शहरातील चार जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे हे विशेष. या आधी २०१२ मध्ये डॉ. महेंद्र महाजन यांनी, गेल्यावर्षी २०१७ मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर आता २०१८ मध्ये किशोर काळे आणि विजय काळे यांनी ही किमया साधली आहे. या स्पर्धेत एकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग ४० किमीचा चढायचा असल्याचे शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान जिवंत असते. त्यामुळे सहकाºयांचा तगडा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नसते.
नाशिककर सायकलिस्टने पूर्ण केली डेथ रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:31 AM