नाशिक : नियतीने कितीही कटू प्रसंग झोळीत टाकले तरी खचून न जाता आपल्या वाट्याला आलेल्या दु:खांवर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मात करावी. पडलो म्हणून थांबायचं नसतं तर पुन्हा नव्या उत्साहाने उठून आत्मविश्वास व स्वाभिमानाने जीवन जगावे, असे मत कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स आॅफ दी हॅण्डिकॅप्ड’ संस्थेच्या संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा हुरजूक यांनी मांडले. सिनर्जी फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.२) संध्याकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘माझी चाकाची खुर्ची’ या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त के ले. प्रा. मुग्धा जोशी यांनी हुरजूक यांच्याशी संवाद साधत विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी सत्कार केला. ‘खुदी को कर बुलंद इतना, कि हर तकदीर से पहले खुदा बन्दे से ये पूछे, बता तेरी रज़ा क्या है’ हा शेर म्हणताच टाळ्यांच्या कडकडाटाने नाशिककरांनी त्यांचे स्वागत केले. हुरजूक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, सोळाव्या वर्षी आलेल्या अपंगत्वामुळे मनात अनेकदा आत्महत्त्येचा विचारही आला. तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेले अपंगत्व व हरपलेले पितृछत्र हे सर्व प्रचंड धक्कादायक होते. घरातील कर्ता पुरुष जाण्याने आईवर सर्व जबाबदारी आली; मात्र ती हरली नाही तिने मोठ्या हिमतीने आम्हा भावंडांना सांभाळून उच्चशिक्षण दिले.
नसीमा हुरजूक : ‘माझी चाकाची खुर्ची’ प्रकट मुलाखत
By admin | Published: October 02, 2016 11:52 PM