नाशिक : महापालिकेचे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा सिडकोतील सराईत गुन्हेगार प्रणव तुकाराम बोरसे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ जिमेकर यांनी शनिवारी (दि़५) सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्यातील बोरसेचा साथीदार बाळा कापडणीस हा घटनेपासून अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
१५ एप्रिल २०१६ रोजी कामटवाडे परिसरातील मयूर हॉस्पिटलजवळ नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर सराईत गुन्हेगार प्रणव बोरसे व त्याचा साथीदार बाळा कापडणीस यांनी प्राणघातक हल्ला केला होता़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी तसेच प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायाधीश जिमेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारी वकील अॅड़ कल्पक निंबाळकर यांनी दहा साक्षीदार तपासून आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़
न्यायालयात हल्ल्यातील गंभीर जखमी दिलीप दातीर यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघ, रवींद्र सहारे, महेश इंगोले व पो. कॉ. सचिन सुपले यांनी केला होता़ सरकार पक्षातर्फे अॅड़ कल्पक निंबाळकर यांनी तर दातीर याच्या बाजूने अॅड़ श्यामला दीक्षित यांनी काम पाहिले़