नाशिक : मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर गुरुवारपासून (दि.२६) सुरू झाली असून, शहरातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त १७ हजार ८० जागांसाठी दुसऱ्या फेरीत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्यासोबतच प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
मराठा आरक्षणामुळे यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर लागू होणार प्रवर्ग निवडण्याची सुविधा शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली असून, विद्यार्थ्यांना १ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यांच्या अर्जात आवश्यक ते बदल करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनही भरता येणार आहे, तर मार्गदर्शन केंद्र तथा माध्यमिक शाळा यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित करतील, तसेच व्यावस्थापन तसेच अल्पसंख्याक कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यालयांना अर्जही मागविता येतील अशा स्पष्ट सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत.
इन्फो-
प्रतिबंधित विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरीत संधी
सर्वोच्च न्यायालयाचे एसईबीसी संदर्भातील निर्णयाचे अनुषंगाने प्रवेेशप्रक्रिया स्थगित ठेवण्यात आलेली असल्याने यावर्षी प्रवेशास विलंब झालेला आहे. त्यामुळे यापूर्वी प्रवेश नाकारलेला आहे. प्रवेश रद्द केलेला आहे. अथवा प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रथम फेरीत प्रवेश घेतलेला नाही. अशा प्रतिबंधित विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याची संधी देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.