नाशिक : मे महिन्याच्या अखेरीस नाशिककरांना पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.२३) प्रखर ऊन पडल्याने कमाल तपमानाचा पारा पुन्हा चाळिशी जवळ पोहचला. दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणामध्ये उष्णता वाढू लागली आहे. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने ३९.९ अंश इतक्या कमाल तपमानाची मंगळवारी नोंद केली. सोमवार कमाल तपमान ३८ अंश इतके नोंदविले गेले होते. एका दिवसात दोन अंशांनी पारा अत्यंत वेगाने चढल्यामुळे नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत होता. मे महिन्याचे अखेरचा आठवडा शिल्लक राहिला असून, उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने कमाल तपमानात वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे नाशिककर पुन्हा चिंताग्रस्त झाले आहे. पारा चाळिशीपासून केवळ एक अंशाने मागे राहिला.
यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे संध्याकाळपर्यंत शहरातील रस्ते सुने-सुने झाल्याचे चित्र होते. वाढत्या उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. तपमानाचा पारा पुन्हा चढू लागल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सध्या लग्नसराईचा कालावधी असल्यामुळे लग्नसमारंभात हजेरी लावताना महिला, ज्येष्ठ नागरिक व मुलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
आठवड्याचे कमाल तपमान १६ मे - ३७.४१७ मे - ३६.९१८ मे - ३७.८१९ मे - ३७.२२० मे - ३७.३२१ मे - ३६.३२२ मे - ३८.०२३ मे - ३९.९