नाशिक : मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८ अंशांपर्यंत वर सरकला, तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या. हवामानातही बदल झाला असून, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी ३६.२, तर दुसºया दिवशी ३६.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानात काही अंशी घट झाली असली तरी वाताव-रणातील उष्मा कायम आहे. उन्हाची तीव्रता कायम असून, तपमानाचा पारादेखील ३५ अंशांच्या जवळपास स्थिरावत आहे. मार्च महिना संपूर्णत: ‘हॉट’ राहणार असून, शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. उत्तर महाराष्टÑातील नाशिक, नंदुरबार, जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे सरकले आहे. राज्यात भिरा येथे सर्वाधिक ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. यापाठोपाठ चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांनाही उन्हाचा जोरदार तडाखा बसत आहे. भिरानंतर चंद्रपूरमध्ये ३८.४ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. एकूणच विदर्भात उष्मा वाढला आहे. नाशिकमध्येही उन्हाची तीव्रता वाढत असून, वाºयाचा वेग मंदावलेला राहिला, तर कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची शक्यता आहे. एकूणच कडाक्याच्या थंडीनंतर आता नाशिककरांना उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करावा लागणार आहे. हवामान बदल आणि उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. नागरिकांनी पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत; मात्र उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड फळे, फ्रीजमधील पाणी, बर्फाचे गोळे, आइस्क्रीमचा होणारा मोह तूर्तास टाळणे आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे आहेत. थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केलेला उत्तम, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.स्कार्फ, कॅपला मागणीउन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे स्कार्फ, कॅप, गॉगल्स, हॅट, ओढणी, सनकोट आदी वस्तूंना मागणी वाढली आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणात स्कार्फ, सनकोट गॉगल्ससह सन लोशन क्रीमचा वापर करतात. यामुळे या वस्तूंना मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे किमतीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिक @ ३४ : वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:50 AM