- धनंजय रिसोडकर नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणारा व ५.६ टीएमसी क्षमतेचा दमणगंगा -वैतरणा - कडवा- देव नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार हा नदीजोड प्रकल्प ७५०० कोटी रुपयांचा असून त्यामुळे सिन्नर तालुक्यांतील १३ हजार ८०० हेक्टर सिंचन होणार आहे.
त्याशिवाय दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्याची राज्यभरातील दुष्काळी परिस्थिती बघता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागू शकतो. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दमणगंगा व वैतरणा खोर्यातील निळमाती, मेट, कोशिमशेट, उधळे येथे बंधारे बांधणे. ऊर्ध्व वैतरणा-कडवा ते बोरखंड धरणांचा उपयोग करून पाणी वळविणे. या चार जलाशयांमधील पाणी वैतरणा धरणात आणून तेथून २८ किलोमीटर पाइपने कडवा धरणात टाकणे. तसेच बोरखिंड ते देवनदीदरम्यान पाइपलाइन व बोगद्याद्वारे पाणी सिन्नर तालुक्यात देवनदीच्या उगमस्थानापर्यंत आणून तेथून ते सिन्नरच्या पूर्वभागापर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या वीजेची गरज भागवण्यासाठी १३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्चही या सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.