नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणारे व येणारे तसेच नियमीत वैद्यकिय सेवेसाठी जाणा-या नागरीकांसाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना देखील करण्यात आला. आहे. त्यात सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू असून त्यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपाययोजनांच्या दृष्टीने बैठक घेतली. त्यात संचारबंदी स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात न घेता जे अकारण रस्त्यावर फिरत आहेत, अशा उत्साही नागरीकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत भादविक १८८ (१) प्रमाणे १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, संचारदंबदी कालावधीत जीवनावश्यक सेवा आणि अन्य सेवा देण्यासाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध १२ व्हॉटस अप क्रमांक घोषीत करण्यात आले असून परवानगी मिळवण्यासाठी संकेतस्थळाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरीकांना आवश्यक कामासाठी अथवा अत्यावश्यक सेवेतील कामसाठी बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दिनांक, वेळ, दररोज जायचे यायचे असेल तर त्याच्या वेळा त्यासंबंधीच्या कारणांचा स्पष्ट उल्लेख करावा, डायलेसीस किंवा अन्य वैद्यकिय कारणांसाठी बाहेर पडायचे असेल तर त्याबाबतच्या व्यक्तींची माहिती व्हॉटस अपवर पाठवावी असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले आहे.