नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये असलेल्या राहुडी घाटात एक भीषण अपघात घडला. ब्रेक फेल झालेल्या वाहनांनी एसटी बससह पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २० ते २१ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राहुड घाटात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) रात्री १० च्या सुमारास चांदवड येथून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर व पुढे जाणाऱ्या तीन ते चार कार व एक ट्रक तसेच बसच्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. उषा मोहन देवरे (४५, रा. भारत नगर, मालेगाव) असे मृताचे नाव आहे. अपघातात २० ते २१ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाट उतरत असताना कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि समोर असलेल्या पाच-सहा वाहनांना कंटेरनची धडक बसली. यात एक एसटी बसही अपघाग्रस्त झाली.
अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.
एका बाजुने वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली. १०८ व सोमाटोलची रुग्णवाहिकांनी मदत कार्यात सहभाग नोंदविला.