नाशिक : बहुचर्चित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी (दि. १६) पुणे येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पणन महामंडळाच्या बैठकीत या बरखास्तीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर संचालकां- मध्ये या बरखास्तीची चर्चा सुरू होती. दरम्यान, या बरखास्तीच्या कारवाईबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अधिकृत काहीही माहिती नसल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीच्या निर्णयाबाबत १४ आॅगस्ट रोजी अंतिम सुनावणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाली होती.त्यावेळी जिल्हा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याकडे संचालकांनी युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर अहवाल सहकार व पणन खात्याकडे पाठविला जाणार होता. मात्र, दोन आठवडा हा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पडून होता. अखेरला १९ आॅगस्ट रोजी हा अहवाल पणन महामंडळाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे पणन महामंडळ नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले होते. भाजपाकडून बरखास्तीची धास्ती दाखिवली असल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरुवात केली होती. गुरुवारी (दि.१६) पणन महामंडळाची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत, नाशिक बाजार समिती बरखास्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे. बाजार समितीतील संचालक मंडळाने केलेला गैरव्यवहार, अनियमित कामकाज असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर चौकशी समिती नेमून चौकशी झाली होती. या चौकशी अहवालात अनियमतता झाल्याचे सांगत, समिती बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यावर बाजार समितीला नोटीस पाठविण्यात आली होती. बरखास्तीचा निर्णय झाल्याचे कळताच काही संचालकांनी एकत्र येत शुक्रवारी (दि.१७) जिल्हा परिषदेत बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत पुढे काय यावर चर्चा झाल्याचे समजते.दुजोरा नाहीनाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनाच्या पणन महामंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, बरखास्त करण्याबाबत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. - नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:17 AM