शैलेश कर्पेसिन्नर (नाशिक) : सहकारी संस्थांचे सिन्नरचे सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील (५७) यांना एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून कलम १०१ चे प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगहात पकडल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहाय्यक निबंधक कार्यालयात सदर कारवाई केली. यामुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.
सिन्नर तालुक्यातील एका पतसंस्थेला थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची सहकार कायदा १९६० चे कलम १०१ चे प्रमाणपत्र(नोटीस) मिळविणे गरजेचे होते. या पतसंस्थेने १७ थकबाकीदारांची प्रकरणे सिन्नरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केली होती. तथापि, सहाय्यक निबंधक संशयित एकनाथ पाटील यांनी १७ प्रकरणांचे कलम १०१ प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित पतसंस्थेच्या कर्मचाºयाकडे ३४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाच प्रतिबंधक कार्यालयास प्राप्त झाली. तडजोडीअंती २५ हजार ५०० रुपयांत प्रमाणपत्र देण्याचे ठरले.
त्यापोटी सदर पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याने गेल्या काही दिवसांपूर्वी १० हजार रुपये दिले. लाच प्रतिबंधक खात्याला सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचासमक्ष सापळा लावण्यात आला. उर्वरित राहिलेले १५ हजार ५०० रुपये गुरुवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात सदर कर्मचाऱ्याने पाटील यांना देताच लाच प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या पथकाने पाटील यांच्या कार्यालयाची व वाहनाची झडती घेतली. त्यानंतर त्यांना घेऊन शासकीय विश्रामगृहात पंचनामा करण्यासाठी नेण्यात आले. लाचलुचपत विभागाकडून काही तास पंचनामा सुरु होता.
लाच प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक एन. एस. न्याहळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाच प्रतिबंधक पथकात सापळा अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, सहाय्यक उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक मनोज पाटील सहभागी झाले होते.
सिन्नर खरेदी विक्रीच्या संघाच्या माघारीच्या वेळी ट्रॅपसिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीची माघारीची अंतिम दिवस गुरुवारी (दि. २) होता. माघारीसाठी दुपारी ३ पर्यंत मुदत होती. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील हे निवडणूक अधिकारी होते. माघारीच्या शेवटच्या दिवसामुळे त्यामुळे सहाय्यक निबंधक कार्यालयात गर्दी होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास माघारीची प्रक्रिया सुरु असतांना लाच प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने क्षणार्धात त्याची चर्चा तालुक्यात पसरली.