- अझहर शेखनाशिक - शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची गृह मंत्रालयाने मुंबईत विशेष पोलीस महानिरिक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्या रिक्तपदावर पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने मंगळवारी (दि.२१) या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश पारित केला. शिंदे यांनी ११ महिन्यांपुर्वी नाशिक पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती.
शासनाच्या गृह मंत्रालयाकडन मागील दोन दिवसांत भापोसे व रापोसे सेवेतील वरिष्ठ श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहेत. सोमवारी रात्री उशीराही पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. यानंतर मंगळवारी पुन्हा अंकुश शिंदे व संदीप कर्णिक यांच्या बदली आदेश अवर सचिव स्वप्निल बोरसे यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्ररित्या काढण्यात आले. शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तपदाची सुत्रे अंकुश शिंदे यांनी स्वीकारली होती. शिंदे यांची अवघ्या ११ महिन्यात शासनाकडून बदली करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारीवर ‘अंकुश’ ठेवण्यासाठी त्यांनी विविध पथकांची स्वतंत्ररित्या नेमणूक केली होती. यामध्ये खंडणीविरोधी पथक, अमली पदार्थविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, दामिनी पथकांचा समावेश आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई असो किंवा मोक्कासारखी कारवाईदेखील त्यांनी मिळालेल्या कार्यकाळात केली. काही महिन्यांपुर्वी नाशिक शहरात एका आठवड्यात झालेल्या खूनाच्या घटनांमुळे गुन्हेगारीने डोके वर काढल्याची चर्चा सुरू झाली होती. शिंदे यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बदली करत नवीन अधिकाऱ्यांच्या हाती कारभार सोपवून गुन्हेगारी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीही त्यांनी कार्यान्वित केली. यामुळे या भागातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत झाली. शिंदे यांनी आयुक्तालयात राबविलेले काही प्रयोग यशस्वीही ठरले होते. मात्र अचानकपणे शासनाकडून शिंदे यांची बदली करण्यात आली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.