- संदीप भालेराव
नाशिक - आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा बदललेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाल्या. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षकांनी बदलेल्या वेळेचा निषेध करीत काळ्या फीत लावून आंदोलन केले. आश्रमशाळांच्या वेळा बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याचा दावा करण्यात आला.
आदिवासी विकास विभागांच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेऊन सोमवार (दि. १०) पासून अंमलबजावणी सुरू झाली. नवीन वार्षिक वेळापत्रकानुसार सकाळी ८;४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शाळा भरणार आहे. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशीच राज्यभरातील शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत, शाळेची वेळ विद्यार्थ्यांना गैरसोयीची असल्याचे म्हणत, वेळ पूर्ववत करण्याची मागणी केली.राज्यातील आश्रमशाळांमधून या निर्णयाला विरोध सुरू झाला असून, आता शासनाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये असलेले विद्यार्थी दुर्गम, डोंगराळ भागातून शाळेत येत असतात. शाळेची वेळ सकाळी ८:४५ वाजेची करण्यात आल्याने, विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकणार नाहीत, किंबहुना त्यांना पहाटे लवकर उठावे लागले, तर त्यांची पुरेशी झोप होणार नसल्याने, विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही वेळ योग्य नसल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकणार नाहीत, शिवाय पहिली ते चौथीच्या मुलांचा विचार या बदलात करण्यात आला नसल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. सकाळची शाळा असल्याने मुलांना तत्पूर्वी दीड ते दोन तास आधी उठावे लागणार असल्याने, त्यांची पुरेशी झोप होणार नसल्याचा दावाही संघटना करीत आहेत. सकाळच्या शाळेची वेळ आणि दुपारच्या जेवणाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याने मुलांच्या आरोग्याचाही विचार व्हावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांचे वेधणार लक्षराज्याच्या आदिवासी विभागाचे उपसचिव वि.फ. वसावे यांनी वेळापत्रक बदलाचे आदेश काढले आहेत. या आदेशाच्या विरोधात एकवटलेल्या शिक्षक संघटनांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना निवेदन पाठविले जाणार आहे, याशिवाय येत्या शनिवारी मुख्यमंत्री नाशिकला येणार असल्याने, त्यांची भेटही घेतली जाण्याची शक्यता आहे.