नाशिक : वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला. सोमवारी किमान तपमान १९ अंश इतके होते. एकूणच तपमानात होणारी कमी-जास्त वाढ व हवामानात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटेदेखील थंडीची तीव्रता अधिक जाणवते; मात्र सूर्योदयानंतर उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होते. दिवसभर आॅक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्यामुळे औषध फवारणी, स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देऊन आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये, उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा, डोक्यावर टोपी परिधान करावी, संध्याकाळीदेखील बाहेर फिरताना काळजी घ्यावी, दुचाकीवरून प्रवास करताना नाका-तोंडाला रुमाल लावावा व कानात कापसाचे बोळे ठेवावे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नाशिककरांना पुन्हा वातावरण बदलाचा फटका; दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 9:38 PM
वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला.
ठळक मुद्दे फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा रात्री थंडीचा कडाका जाणवतो