नाशिक : नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय? असा प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे. शासनाने नाशिककरांवर अन्याय होणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अॅड. चिन्मय गाढे, रोहन नहिरे, किरण मानके, नवराज रामराजे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, भूषण गायकवाड, सुनील घुगे, राकेश जाधव, योगेश लगरे आदी उपस्थित होते.
पाणी सोडल्यास पालकमंत्र्यांना नाशिक बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:57 AM