ठळक मुद्दे तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा ४२ आठवड्यांचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण पुर्ण
नाशिक : पहाटे साडेतीन वाजता साखर झोपेतून जागे होत ‘कमांड’चे पालन करुन स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४२ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण कठोर परिश्रम घेऊन पुर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक म्हणून घडविले एकूण ४६२ गणरच्या तुकडीने लष्करी थाटात भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज राहण्याची शपथ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.
देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.१७) पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्विकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शनिवारी नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दित सदैव स्मरणात ठेवावी.
तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या ४६२ प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारिरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४२ आठवड्यांचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केले. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, भारतातील सुमारे सैन्यदलाच्या २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात मेजर जनरल श्रीनिवास राव हे सलामी मंचावर येताच जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. त्यानंतर जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली. दरम्यान, ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना जीवन का बलिदान क्यु ना देना पडे...’ अशी शपथ विविध धर्मग्रंथ व तोफांच्या साक्षीने यावेळी घेतली.