नाशिक- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवाजी चुंभळे यांंच्यावरील अविश्वास ठराव आज मंजुर झाला असून १५ विरूध्द एक असे मतदान झाले. त्यामुळे चुंभळे यांना पायउतार व्हावे लागले आहे.
उत्तर महाराष्टÑातील सर्वात मोठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असून यात सत्तेच्या राजकारणाने कळस गाठला आहे. बाजार समितीत १८ संचालक असून त्यातील १२ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर नाशिक बाजार समितीतील राजकारण हे मुद्यावरून गुद्यावर गेले होते. सहकार उपनिबंधनक कार्यालयातच चुंभळे आणि त्यांचे विरोधक संपतराव सकाळे यांच्यात फ्री स्टाईल झाली होती. त्याची पुनरावृत्ती आज होऊ नये यासाठी सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीला पोलीसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. इतकेच नव्हे तर पोलीसांनी संचालकांना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या.
आज सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी १५ विरूध्द एक याप्रमाणे ठराव मंजुर झाला. त्यामुळे चुंभळे हे पाय उतार झाले. नाशिक बाजार समितीत वर्षानुवर्र्षे माजी खासदार देवीदास चुंभळे यांची सत्ता होती. त्यांना पायउतार करून चुंभळे यांनी सत्ता मिळवली होती. मात्र उभयतांचा संघर्ष सुरूच होता.