नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या १० जानेवारीपासून इगतपुरी ते भुसावळ दरम्यान मेमू एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. कोरानाकाळात रेल्वे प्रवासी, सरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय विचारात घेता प्रवाशांच्या मागणीची केंद्र सरकारने दखल घेऊन हा निर्णय घेतला आहे.
भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस रेल्वे १० जानेवारीपासून सुरू होणार असून, या एक्स्प्रेसला मेलचे तिकीट आकारले जाणार आहे. सात स्थानकांवर तिला थांबा देण्यात आला आहे. मेमू एक्स्प्रेस ही नियमितपणे भुसावळ जंक्शनवरून सकाळी ७ वाजता सुटेल. ७.२६ ला जळगाव, १०.०९ ला चाळीसगाव, १२.०८ मनमाड, १३.२३ नाशिक, त्यानंतर दुपारी ३ वाजता इगतपुरीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सकाळी ९.१५ वाजता इगतपुरी येथून सुटणार आहे. भुसावळ जंक्शन येथे ५.१० वाजता पोहोचेल. आठ डब्यांची ही एक्स्प्रेस असेल.
केंद्रीय मंत्री डॅा. भारती पवार यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या रेल्वेबाबत माहिती दिली होती. तसेच नांदगाव, मनमाड व लासलगाव येथील कोरोनाकाळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करण्याची मागणीही केली होती. या मागणीला यश मिळाले असून, मेमू एक्स्प्रेसमुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.