- श्याम बागुल
नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ठाणे जिल्ह्यातील शहापूर खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा झालाच्या तक्रारींवरून महामंडळांकडून खरेदी केंद्र चालविणाऱ्या सोसायटीच्या दोन गुदामांची तपासणी करण्यात आली असून, प्रथम दर्शनी तक्रारीत तथ्य आढळून आल्याने लवकरच घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
साधारणत: खरीपात आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने आदिवासी विकास विभागाकडून धान खरेदी करून ते नंतर मीलमध्ये देवून त्यापासून भात तयार केला जातो व त्याची विक्री केली जाते. राज्यभर यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदीचा उपक्रम राबविला जातो. त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना दोन पैसेही वेळेवर मिळतात. खरीप हंगाम संपल्यानंतरच धानाची खरेदी केली जात असतांना ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे एका सोसायटीमार्फत आदिवासींची धान खरेदी करण्यात अनेक अनियमितता करण्यात आल्याच्या तक्रारी नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोड यांना प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार या तक्रारींच्या आधारे चौकशी सुरू केली असता, त्यात अनेक तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात शहापूर येथे धान उत्पादन घेतले जात नसतांनाही शहापूर खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात धान खरेदी करण्यात आल्याने चौकशी पथकाचा संशय बळावल्याने सखोल चौकशी केली असता, त्यात अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे धानाची वाहतूक करणारे वाहनांचे क्रमांकाची प्रादेशिक परिवहन विभागामार्फत चौकशी केली असता, धान वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचे क्रमांक हे दुचाकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.